शरद गुप्तानवी दिल्ली :
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी घोटाळ्यात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मुख्य आरोपी केलेले असले, तरी त्यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे.
उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच सिसोदिया अबकारी मंत्री व शिक्षणमंत्रीही आहेत. अबकारी धोरण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी तयार केले. उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या निर्देशावरून होत असलेल्या सीबीआयच्या तपासात सिसोदिया यांच्याविरुद्ध प्राथमिकदृष्ट्या पुरावे मिळाले आहेत. परंतु, सिसोदिया यांच्या विरोधात चौकशी सुरू होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीने त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविल्यानंतर व शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्याची प्रशंसा झाल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या अटकेचा राजकीय लाभ-हानीचा हिशेब करीत आहे.
सीबीआय चौकशी सुरू होताच मनीष सिसोदिया हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत गुजरातेत निवडणूक प्रचार करण्यासाठी गेले होते. तेथे शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्याच्या प्रशंसेबरोबरच त्यांना महाराणा प्रताप यांचे वंशज सांगून एक राजपूत नेता म्हणून पुढे आणले आहे. सिसोदिया यांना अटक केल्यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे.
राजकीय शहीद बनवू इच्छीत नाहीतकेंद्र सरकार कोणत्याही स्थितीत सिसोदिया यांना राजकीय शहीद बनवू इच्छीत नाही. यासाठी मंगळवारी रात्री सिसोदियांच्या विरोधात ईडी चौकशीचे वृत्त येताच सरकारने त्याचे जोरदार खंडन केले. केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी आता अबकारी प्रकरणात पैशाच्या देवाण-घेवाणीचे पुरावे गोळा करीत आहेत
आमदार फोडण्यासाठी भाजप कोठून पैसा आणत आहे : आपचा सवालदिल्लीचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असून, आपच्या चार आमदारांना भाजपने २० कोटींची ऑफर दिली होती, असा आरोप आपने केला आहे. दरम्यान, दुसऱ्या पक्षांच्या आमदारांना ऑफर देण्यासाठी भाजप पैसे कोठून आणत आहे, असा सवाल आपने बुधवारी केला आहे. आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह म्हणाले की, आपच्या बैठकीत प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे की, त्यांनी अन्य पक्षांची सरकारे पाडण्याऐवजी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ द्यायला हवा. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, दिल्लीतील आपचे सरकार स्थिर आहे. कोणीही आमदार भाजपत जाणार नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता आपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.
दिल्लीत फुटीसाठी ‘शिंदे’! दिल्लीतील आम आदमी पार्टीमध्ये फूट पाडण्यासाठी ‘शिंदे’ शोधण्याचे काम भाजप करीत असल्याची चर्चा आता दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने ‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीची बैठक आज दिल्लीत बोलाविली आहे. दिल्लीत असलेला आपचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपमधील असंतुष्टांची चाचपणी करून एकनाथ शिंदे शोधण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजप : परवाने देण्याचे खासगीकरण का? अबकारी धोरणात दारूच्या दुकानांना परवाने देण्याचे काम खासगी कंपनीला केजरीवाल सरकारने का दिले, असा सवाल भाजपकडून बुधवारी करण्यात आला. परवाने देण्याचे काम सरकारने करण्याऐवजी खासगी कंपनीला देण्याचे औचित्य काय, असा सवाल भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला.
आपच्या जाळ्यात अडकला भाजपअरविंद केजरीवाल यांच्या जाळ्यात भाजप अडकताना दिसत आहे. भाजप नेते अबकारी घोटाळ्याचे नवे पैलू बाहेर आणण्याऐवजी सिसोदिया यांच्याबाबत न्यू यॉर्क टाईम्समध्ये लिहिलेले लेख व त्यांना राजपूत नेता बनविल्याच्या दाव्यांवर टीका करीत आहेत. घोटाळ्याची चर्चा कमीत कमी व्हावी, हेच तर आम आदमी पार्टीला पाहिजे आहे.