Ahmedabad Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी गुजरात पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गुजरातच्याअहमदाबाद आणि गांधीनगरमधील अनेक स्पा सेंटरवर सीआयडी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे छापा सत्र सुरु आहे. अशातच अहमदाबादमधील अनेक स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली घाणेरडे काम सुरू असल्याचे समोर आलं आह. गुजरात सीआयडीच्या पथकाने अनेक भागात छापे टाकून अनेक परदेशी तरुणींना ताब्यात घेतलं आहे. पैशांसाठी परदेशी तरुणींना अवैध व्यवसायात ढकलण्यात आले होते. मात्र एका स्पावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना परदेशी महिलेने मारहाण केल्याचे समोर आलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सीआयडी अहमदाबादमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या धंदाविरोधात कारवाई करत आहे. अहमदाबादच्या वेगवेगळ्या स्पामधून अनेक परदेशी तरुणी पकडल्या गेल्या आहेत. सीआयडीच्या पथकाने छाप्यात पकडलेल्या परदेशी तरुणीच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांनी तब्बल चार तास हाय व्होल्टेज ड्रामा केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका किरगिझ महिलेने सीआयडीच्या पथकावर हल्ला केला. व्हायरल व्हिडीओमध्ये परदेशी तरुणी अधिकाऱ्यांना लाथेने आणि चप्पलने मारताना दिसत आहे. या तरुणीला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अहमदाबादच्या एका स्पामध्ये छाप्या दरम्यान पकडले होते. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना तिच्या पासपोर्टची व्हेरिफिकेशन करायचे होते. यासाठी महिला थांबलेल्या हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले होते.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी व्हेरिफिकेशनसाठी पासपोर्ट मागितला तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या परदेशी तरुणीने पोलिसांशी गैरवर्तन केले. या तरुणीने पासपोर्ट मागताच पोलिसांवर हल्ला केला आणि चप्पल फेकली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याला लाथ मारली. या कृत्यात तरुणीची बहीण देखील पोलिसांशी हुज्जत घालत होती.
जवळपास चार तास किरगिझ तरुणी आणि पोलीस यांच्यात हा हाय व्होल्टेज ड्रामा चालला. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी व्हिडिओत दिसणाऱ्या दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन वस्त्रापूर पोलीस ठाण्यात आणले. व्हिडीओ समोर आल्यानंतर सीआयडी क्राइमच्या अधिकाऱ्यांनी तपासात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी तरुणींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.