Raids on PFI, Imtiaz Jaleel: सध्या संपूर्ण देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात खूप मोठी कारवाई सुरू आहे. तीन-चार दिवसांपूर्वी या ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकत अनेकांना ताब्यात घण्यात आले होत. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास पुन्हा ७ विविध राज्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दरम्यान जवळपास १७० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) १३ राज्यांत छापे टाकत १०६ पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. आज दुपारपर्यंत महाराष्ट्रात ४३ तर देशभरातून २४७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. या मुद्द्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याबाबतीत आम्ही जास्त काही बोलणार नाही. याचे कारण ATS किंवा तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. अशा वेळी त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी नक्कीच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे. ते करत आहेत त्यावर आम्ही बोलणे बरोबर नाही. पण तपास यंत्रणांकडे काहीच पुरावे नसतील तर अशा वेळी उगाच त्यांना त्रास देणं ही कारवाई चुकीची आहे असं मला वाटतं. कारण अगोदरही असं घडलं आहे की काही काही मुलांना अतिरेकी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले, कोर्टाचे खेटे घालावे लागले, १०-१० वर्षे त्यांची तुरूंगात गेली आणि नंतर मात्र त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली अशी उदाहरणे आपल्याकडे आहेत", असे जलिल म्हणाले.
"कोणतीही तपास यंत्रणा असो, त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर कारवाईचा विरोध कोणीच करणार नाही. पीएफआय असो, वा आणखी कोणतीही संघटना असो, त्यावर कारवाई केली जायलाच हवी. पण पुरावे नसतील तर फक्त शक्यतांच्या आधारावर त्यांना डांबून ठेवू नका. कारण त्यांच्या परिवारातही लोकं आहेत. त्यांचे कुटुंबीय आम्हाला भेटायला येतात तेव्हा सांगतात की आमच्या मुलांची चूक नाही. त्यांना मी समजवतो आहे की जर चूक नसेल तर चौकशी झाल्यावर त्यांच्या मुलांना नक्कीच सोडण्यात येईल. पण तपास यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे", असेही जलील यांनी स्पष्ट केले.
"PFI च्या कार्यकर्त्यांवर जी कारवाई केली जात आहे त्याबद्दल विविध मते मांडली जात आहेत. पण मी त्या मतांवर काही बोलणार नाही. कारण तपास यंत्रणांनी काय पुरावे दिले आहेत ते मलाही माहिती नाही. तपास यंत्रणांनी कोर्टात त्यांचे म्हणणे सील केलेल्या पाकिटातून मांडले. त्यामुळे तपास यंत्रणांनी जी चौकशी करायची असेल ती त्यांनी करावी आणि सत्यता समोर आणावी. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कारवायांचा या देशात कोणीही समर्थन करणार नाही", असेही जलील यांनी ठणकावले.