ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 2 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परिवर्तन महारॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट रचला गेला होता का ? 20 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदींच्या आग्रामध्ये झालेल्या रॅलीआधी कानपूरजवळील पुखराया येथे झालेला रेल्वे अपघात कोणत्या कटाचा भाग होता का ? असे सवाल सध्या सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. शनिवारी कानपूरमधील मंधना येथे काही अज्ञात लोकांनी रेल्वे रुळ कापण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर सोशल मीडियावर हे प्रश्न विचारले जात आहेत. स्वत: केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यामागे कट असल्याची शंका असल्याचं मान्य केलं आहे. सुरेश प्रभूंनी एका ट्विटला रिट्विट केलं होतं ज्यामध्ये कट असल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती.
रविवारी रात्री अंकुर सिंग नावाच्या व्यक्तीने हे ट्विट केलं होतं. 'लखनऊत मोदींच्या रॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट होता. गेल्या वेळी झालेला रेल्वे अपघातही मोदींचा कार्यक्रम सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच झाला होता,' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. सुरेश प्रभू यांनी हे ट्विट रिट्विट केलं असल्याने रेल्वे मंत्रालयही कट असल्याची शंका मान्य करत असल्याचं मानलं जात आहे. याअगोदर कानपूरचे खासदार मुरली मनोहर जोशी यांनीदेखील पुखरायामधील रेल्वे अपघात कटाचा भाग असल्याचं म्हटलं होतं.
Train accident planned before tomorrow's big Modi rally in Lucknow. Last train accident also happened just few hours before big Modi event. pic.twitter.com/sHaohobio9— Ankur Singh (@iAnkurSingh) 1 January 2017
शनिवारी कानपूरजवळील मंधना येथे काही अज्ञात लोकांनी रुळ कापण्याचा प्रयत्न केल्यानंतर धावाधाव सुरु झाली होती. गस्त पथक वेळेवर पोहोचल्याने या लोकांनी पळ काढला होता.
फक्त दीड महिन्यात कानपूरमध्ये दोन मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. गस्त पथकाच्या सतर्कतेमुळे अजून एक मोठा अपघात टळला.
It would be investigated throughly by multidisciplinary experts https://t.co/f1m08pACBZ— Suresh Prabhu (@sureshpprabhu) 1 January 2017
28 डिसेंबर रोजी कानपूरमधील रुरा स्टेशनजवळ रेल्वे अपघात झाला होता. यामध्ये एक्स्प्रेसचे 15 डबे रुळावरुन घसरले होते. 52 प्रवासी या अपघातात जखमी झाले होते. 20 नोव्हेंबर रोजी पुखराया येथे भीषण रेल्वे अपघात होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर प्रवासी जखमी झाले होते. त्याच दिवशी मोदींची परिवर्तन रॅली पार पडली होती. इतका मोठा अपघात होऊनदेखील मोदींनी रॅली घेतल्याने त्यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती.