भाजपाने दिली नववर्षात महागाईची भेट; काँग्रेस, माकपने साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 09:25 AM2020-01-02T09:25:50+5:302020-01-02T09:38:41+5:30
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे.
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 19 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच नव्या वर्षात रेल्वे सेवाही महागली आहे. ही दरवाढ भाजपा सरकारकडून देशवासियांना मिळालेले गिफ्ट असल्याची टीका काँग्रेस आणि माकपने केली आहे. केंद्र सरकारने 31 डिसेंबरपासून रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. एक ते चार पैसे प्रति किलोमीटर अशी ही दरवाढ असून प्रत्येक दर्जाच्या सेवेसाठी दर वेगवेगळे राहणार आहेत.
नव्या वर्षाला प्रारंभ होताच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. विनाअनुदानित घरगुती सिलिंडर 19 रुपयांनी महागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने ही दरवाढ झाली आहे. भारतातून इंधनाची 84 टक्के आयात केली जाते. त्यामुळे तेथील दरांचा परिणाम हा भारतातील अर्थकारणावर होतो. दोन्ही दरवाढीवरून काँग्रेस आणि माकपने भाजपावर निशाणा साधला आहे.
सर्वसामान्य नागरिक आधीपासूनच महागाईने त्रस्त आहेत. असं असताना गॅस सिलिंडरची दरवाढ ही त्यांना आणखी आर्थिक गर्तेत नेणार असल्याचे काँग्रेस प्रवक्त्या सुष्मिता देव यांनी म्हटलं आहे. तसेच एकीकडे नोकऱ्या जात असताना दुसरीकडे मोदी सरकार सर्वसामान्यांचे जगणे महाग करत असल्याची माकपचे महासचिव टीका सीताराम येचुरी यांनी केली आहे. मोदी सरकारकडून देशवासियांना मिळालेलं हे अनोख गिफ्ट असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो)च्या दरात 19 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर (19किलो)च्या किंमतीत 29.50 वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत.
लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने घेतला. या घोषणेनंतर मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. नवे तिकीट दर प्रतिकिमीप्रमाणे अपलोड करताना तांत्रिक बिघाड येत होता. परिणामी, रेल्वे प्रशासनाने त्यावेळी तिकीट खिडक्यांवरून तिकिटांची विक्री केली. नवे तिकीट दर अपलोड करण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. मात्र यामुळे रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.