Vande Bharat Train:आताच्या घडीला वंदे भारत ट्रेनचा मोठा बोलबाला देशात आहे. देशभरातील अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू झाली असून, त्याला प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातच आता जम्मू ते काश्मीर मार्गादरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल लिंक परियोजनेचे काम पूर्णत्वास जाणार आहे. यानंतर या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वेसेवांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश करण्यात येणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. भारतीय रेल्वे सुविधा वाढवणे आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यावर भर देत आहे, असे त्यांनी नमूद केले. काश्मीरमधील बडगाम येथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची देखभाल कार्य करण्यात येणार आहे. या शिवाय या मार्गावर वंदे भारत मेट्रोही सुरू करण्यात येणार आहे. ही वंदे भारत मेट्रो जम्मू ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. हा रेल्वे मार्ग काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडेल, असेही ते म्हणाले.
जम्मू ते श्रीनगरमधील अंतर ३.५ तासांत पूर्ण करता येणार
काश्मीरचा भाग भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला की, जम्मू ते श्रीनगर हा प्रवास प्रवाशांसाठी सोपा होईल. रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर जम्मू ते श्रीनगर हा प्रवास ३.५ तासांत पूर्ण करता येईल. हा रेल्वे मार्ग खुला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधून सफरचंद आणि इतर कृषी उत्पादनांची वाहतूक करणे सोपे होईल, असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच विशेष वंदे भारत ट्रेन काश्मीरसाठी तयार करण्यात आली आहे. या ट्रेनचे डिझाइन वेगळे असणार आहे. कारण काश्मीरचे तापमान देशाच्या अन्य भागापेक्षा अतिशय वेगळे आहे. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने रेल्वे ट्रॅकवर बर्फाचा ढीग साचतो. ट्रेनमध्ये अशी काही व्यवस्था असेल की ती बर्फवृष्टीतही सुरळीत धावू शकेल. तसेच ट्रेनमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, देशात आतापर्यंत १० वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. लवकरच आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. यातील एक वंदे भारत मध्य प्रदेशातून सुरू करण्यात येणार आहे. तर दुसरी वंदे भारत ईशान्य भारतासाठी सुरू करण्यात येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"