ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांकडून वापरली जाणारी ब्लँकेट्स दोन महिन्यातून फक्त 'एकदाच' धुतली जातात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनीच याबाबत माहिती दिली असून यामुळे रेल्वेतील स्वच्छतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुदैवाने बेडशीट्स (चादर) आणि उशांचे अभ्रे तरी रोज धुतले जातात. प्रवासादरम्यान रेल्वेकडून प्रवाशांना पुरवल्या जाणा-या वस्तूंचा दर्जा आणि स्वच्छतेबाबत संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिन्हा यांनी ही बाब उघड केली. सध्या रेल्वेकडे फक्त ४१ लाँड्री मशिन्स असल्याने ब्लँकेट्स वगैरे दोन महिन्यांतून एकदा धुता येतात, जिथे मशिन लाँड्री नाहीत, तिथे बाहेरुन धुलाई प्रक्रिया केली जाते, अशी माहिती सिन्हांनी दिली. मात्र येत्या दोन वर्षांत आणखी २५ मशिन्स आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न असून त्यामुळे सुमारे ८५ टक्के प्रवाशांना स्वच्छ ब्लँकेट्स मिळू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती हामिद अन्सारी ' पूर्वीप्रमाणे आताही प्रवाशांनी घरून स्वत:ची उशी, चादर आणण्यास सुरूवात केली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असता ही सूचना चांगली असल्याचे सिन्हा यांनी नमूद केलं.
रोजच्या रोज ब्लँकेट्स धुणे शक्य नसल्यानेच रेल्वेतर्फे प्रवाशांना एक्स्ट्रॉ बेडशीट देण्यात येत असल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.