बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर ओडिशामध्ये आणखी एक विचित्र रेल्वे अपघात घडला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार एका मालगाडीखाली सापडून सहा मजुरांचा मृत्यू झाला. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. जाजपूर रोड रेल्वेस्टेशनजवळ उभ्या एका मालगाडीचे काही डबे अचानक घसरले आणि त्याखाली सहा मजूर चिरडले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार या मालगाडीला इंजिन नव्हते. तसेच ती सेफ्टी ट्रॅकवर उभी करण्यात आली होती. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, जोराचा वारा वाहत होता. त्यादरम्यान हे मजूर ट्रेनच्या डब्याखाली आडोशाला गेले. हे मजूर रेल्वेच्या कामावर आले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मजूर पावसापासून बचावासाठी उभ्या राहिलेल्या मालगाडीखाली थांबले होते. मात्र अचानक विनाइंजिनची मालगाडी धावली आणि हे मजूर तिच्याखाली सापडले.
रेल्वेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, अचानक वादळी वारे वाहू लागले.मजूर बाजूच्या रेल्वे लाईनवर काम करत होते. तिथे एक मालगाडी उभी होती. हे मजूर तिच्याखाली लपले. मात्र ही मालगाडी अचानक हलली, त्यामुळे हा अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी झाले. दरम्यान, या जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये २८८ जणांचा मृत्यू झाला होता.