New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये १४ महिलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांना आणि जखमी झालेल्यांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, असे सरकारने म्हटलं. याशिवाय नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्यांना अडीच लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भरपाईही वाटप सुरू झालं आहे. मात्र ही भरपाई देण्याच्या पद्धतीवरुन आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रेल्वेने पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली. रविवारी सकाळी कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना रेल्वेकडून १० लाख रुपये रोख देण्यात आले. ही रक्कम १०० आणि ५०० च्या नोटांच्या बंडलमध्ये वाटण्यात आली. "मृतांचे शवविच्छेदन तीन रुग्णालयांमध्ये करण्यात आहे. त्यानंतर शवागारात असलेल्या प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करुन काही तासांतच मृतदेह त्यांच्या नातेवाईकांसह आणि सुरक्षा रक्षकांसह त्यांच्या गावी पाठवण्यात आले," अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र रेल्वे मंत्रालयाने २०२३ मध्ये यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रेल्वे तत्काळ मदतीसाठी फक्त ५०,०० रुपये रोख देऊ शकते. उर्वरित रक्कम चेक, आरटीजीएस, एनईएफटी किंवा इतर पद्धतींद्वारे दिली जाते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मृतांच्या कुटुंबीयांना रोख रक्कम दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारीही तैनात केले. जेणेकरून रोख रक्कम पीडितांच्या सुरक्षितपणे घरी पोहोचवता येईल.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तात्काळ मदत आहे आणि ती भरपाईपेक्षा वेगळी आहे. सर्व जखमींवर लेडी हार्डिंग हॉस्पिटल आणि लोक नारायण जयप्रकाश हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.