नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यात रेल्वेसाठी केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. पुढील ३ वर्षात भारतात ४०० वंदे भारत ट्रेन आणणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. सर्वांची साथ याला आमचं प्राधान्य राहील असंही सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गतीशक्ती मिशनच्या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडला.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पुढील ३ वर्षात भारतात ४०० हून अधिक वंदे भारत ट्रेन बनवण्यात येतील. तसेच पंतप्रधान गती शक्ती १०० कार्गो टर्मिनल्स उभारले जाणार आहेत. अर्बन ट्रान्सपोर्टला रेल्वेशी जोडलं जाणार आहे. २०२३ पर्यंत रेल्वे नेटवर्क २०० किमी वाढवण्यात येईल. वन स्टेशन वन प्रोडक्ट अंतर्गत लहान शेतकरी आणि लघु उद्योजकांसाठी नवीन उत्पादनं आणि कार्यक्षम लॉजिस्टिक विकसित करणार आहे असं त्यांनी सांगितले.( Railway Budget 2022-23)
पुढील २५ वर्षाचा मास्टर प्लॅन
पुढील २५ वर्षाचा प्लॅन ठेवून देशाचा अर्थसंकल्प तयार केला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ९.२ टक्के राहील असा विश्वास आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत पुढील ५ वर्षात ६० लाख नोकऱ्या उपलब्ध होतील. डिजिटल इकोनॉमीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. रस्ते, रेल्वे, हवाई, जल वाहतुकीसाठी गुंतवणूक केली जाणार आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.( Highlights of Railway Budget 2022)
आर्थिक वाढीमध्ये रेल्वेची भूमिका
सोमवारी केंद्रानं सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अनेक रेल्वे प्रकल्प सुरू आहेत आणि अनेक प्रकल्प येणाऱ्या काळात प्रस्तावित आहेत, भांडवली निधीसाठी नवीन मार्ग तयार केले गेले आहेत, ज्यामुळे आगामी काळात कॅपेक्समध्ये मोठी वाढ होईल. यामुळे संपूर्ण रेल्वे यंत्रणा देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून उदयास येईल. आगामी काळात देशाच्या आर्थिक प्रगतीत रेल्वेची मोठी भूमिका पाहायला मिळणार आहे.
आर्थिक पाहणीत हवाई प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची चर्चा आहे, तर रेल्वे अजूनही जुन्या काळात परतलेली नाही. सर्वेक्षणानुसार, हवाई प्रवासी वाहतूक कोरोनापूर्वीच्या काळात परतली आहे, परंतु रेल्वे वाहतूक अजूनही खूप मागे आहे. प्रवाशांच्या मासिक आकडेवारीनुसार हे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की २०२१-२२ मध्ये (डिसेंबरपर्यंत), भारतीय रेल्वेची एकूण मालवाहतूक १,०२९.९४ दशलक्ष टन (MT) होती, जी २०२०-२१ मधील याच कालावधीतील ८७०.०८ वरून १८.३७ टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय रेल्वेने कोविड महामारीपूर्वी (२०१९-२०) वर्षभरात मालवाहतुकीत सुमारे १६ टक्के वाढ नोंदवली, त्याच कालावधीच्या तुलनेत, जेथे मालवाहतूक ८८८.८८ मेट्रिक टन होती.