मुंबई : नवीन वर्षात रेल्वेकडून प्रवाशांच्या खिसा हलका केला जाणार आहे. स्टेशन तसेच गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे दर ३० ते ५० टक्के वाढविण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. रेल्वेकडून देशभरातील जवळपास ८०० गाड्यांमध्ये जेवणाचा विशेष डबा (पॅन्ट्री कार) लावला जातो. यासोबतच ५० कंपन्यांना विविध स्टेशन्स तसेच पॅन्ट्री कार नसलेल्या गाडीत खाद्यान्न पुरविण्याची ३०० विविध प्रकारची कंत्राटे देण्यात आली आहेत. आता मात्र जीएसटीअंतर्गत कच्च्या मालाचे दर कमी-अधिक झाल्याने खाद्यान्नाचे दर वाढविण्याची मागणी कंत्राटदारांकडून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेही त्याबाबत सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले.खाद्यान्नाची सेवा पुरविणाºया रेल्वे मंडळाच्या पर्यटन व कॅटरींग संचालनालयाची अलिकडेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सध्याचे खाद्यान्नांचे दर हे २०१२ चे आहेत. तेव्हापासून आतापर्यंत महागाई वर्षाला ६-७ टक्क्यांनी वाढत आहे. यासोबतच आता स्टेशनवरील खाद्यपदार्थांवर पाच टक्के आणि गाडीतील खाद्यपदार्थावर १८ टक्के जीएसटी लागत आहे.मात्र त्याचा समावेश प्रवाशांना देण्यात येणाºया खाद्यान्नाच्या दरात करण्यात आलेला नाही. तसेही रेल्वेचे सध्याचे खाद्यान्नाचे दर बाजारापेक्षा खूप कमी आहेत. यामुळेच जीएसटी आणि महागाई यांचा विचार करून दरांचा सुधारित तक्ता तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. २०१८ पासून हे सुधारित दर लागू केले जाऊ शकतात, असे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले.स्टेशन असो वा गाडी, दोन्ही ठिकाणी शाकाहारी न्याहरी ३० आणि मांसाहारी ३५ तर शाकाहारी जेवण ५० आणि मांसाहारी ५५ रुपये हे दर रेल्वेने निश्चित केले आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी कंत्राटदार त्यापेक्षा अधिक दर आकारतात. सोबतच खाद्यान्नांचा दर्जादेखील वाईट असतो. त्यासंबंधीच्या हजारो तक्रारी रेल्वेकडे येऊन पडतात, हे विशेष.
रेल्वेची खानपान सेवा नववर्षात महागणार , ३० ते ५० टक्के वाढीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:58 AM