IRCTC Ramayan Yatra Train: भगवान श्रीराम यांच्या भक्तांसाठी रेल्वेनं (Indian Railway News) रेल्वेनं खास रामायण यात्रा ट्रेनला सुरुवात केली आहे. आयआरसीटीसीनं (IRCTC) धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'देखो देश अपना' या मोहिमेअंतर्गत डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन सुरू केली आहे. पण या ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडवरुन सध्या जोरदार वाद सुरू आहे. 'रामायण एक्स्प्रेस'मधील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवण्यात आला होता. यावरुन उज्जैनच्या संतांनी सोमवारी याबाबत आक्षेप नोंदवला आणि रेल्वेनं जर कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलला नाही तर १२ डिसेंबर रोजी 'रामायण एक्स्प्रेस' रेल्वेला दिल्ली रोखलं जाईल असा इशारा दिला होता. रेल्वेतील वेटर्सच्या ड्रेस कोडचा रंग भगवा ठेवणं हा तर हिंदूंचा अपमान असल्याचं संतांचं म्हणणं आहे.
साधू-संतांनी आक्षेप नोंदवल्यानंतर रेल्वेनं तातडीनं 'रामायण एक्स्प्रेस'मधील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड बदलण्याचा निर्णय घेतला. "रामायण एक्स्प्रेसमधील सर्व्हिस स्टाफचा ड्रेस कोड पूर्णपणे बदलण्यात आला आहे. आता सर्व्हिस स्टाफ प्रोफेशनल कपड्यांमध्ये दिसणार आहेत. झालेल्या असुविधेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो", असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
रामायण एक्स्प्रेसमधील कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड बाबतची नाराजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कळवली होती असं उज्जैन आखाडा परिषदेचे माजी महासचिव अवधेशपुरी यांनी म्हटलं आहे. रेल्वेत प्रवाशांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना भगव्या रंगाचा पोशाख आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा देण्यात आल्या होत्या. हे हिंदू धर्माचा आणि संतांचा अपमान करणारं आहे, असं अवधेशपुरी यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड न बदलल्यास सर्व साधू रेल्वे रुळावर बसून रामायण एक्स्प्रेसला रोखतील असा इशारा देखील त्यांनी दिला होता.