मुंबई, दि. 28- विमान प्रवासात एअर होस्टेसकडून प्रवाशांचं स्वागत केलं जातं. तसंच प्रवासादरम्यान प्रवाशांना लागणाऱ्या सुविधा पुरविण्याचं काम एअर होस्टेसकडून केलं जातं असल्याचं आपण पाहिलं आहे. विमान प्रवासातील हा अनुभव आता रेल्वे ट्रेनने प्रवास करतानाही प्रवाशांना अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. लवकरच विमानाप्रमाणेच तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवेश करताना प्रवाशांचं हसतमुखाने रेल होस्टेसकडून स्वागत केलं जाऊ शकतं. 8 तासात मुंबई गोवा अंतर पार करणारी लक्झरीयस एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये लवकरच प्रवाशांना रेल होस्टेस दिसण्याची शक्यता आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये रेल होस्टेसचा प्रयोग मुंबई ते करमाळी मार्गावर चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये राबविला जाणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘आयआरसीटीसी’ला तेजसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. या रेल होस्टेस हिंदी आणि इंग्रजीत प्रवाशांशी संवाद साधू शकतील. कंत्राटी तत्त्वावर या रेल्वे सुंदरींची भरती करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
तेजस एक्सप्रेस ही प्रवाशांना विमानप्रवासाचा फील देणारी, अत्याधुनिक ट्रेन आहे. तेजस एक्सप्रेस अगदी कमी वेळेतच लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेकडून 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसंच या ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे, डब्ब्यांमझ्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग या सगळ्या सुविधा प्रवाशांना अनुभवायला मिळत आहेत.
गतिमान एक्सप्रेसचा पॅटर्न राबविणाररेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून याआधी आग्रा-दिल्ली मार्गावरील गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल होस्टेसची नेमणूक केली आहे. सध्या रेल्वे मंत्रालयाकडून आग्रा-दिल्ली मार्गावरील गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुंदरींची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी दिल्ली ते आग्रा आणि संध्याकाळी आग्रा ते दिल्ली अशा दोन फेऱ्या चालणाऱ्या गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना खानपान पुरविण्याची जबाबदारी रेल्वे सुंदरींवर आहे. गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल होस्टेसच्या नेमणुका आयआरसीटीसीतर्फे करण्यात आल्या आहेत. एका डब्यातील प्रवाशांना वेळेत खाद्यपदार्थ पुरविण्याची जबाबदारी दोन महिला कर्मचाऱ्यांवर असते. त्यासोबत स्वच्छतेसाठी अन्य कर्मचारीही नेमले जाते.