ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - देशातील रमाभक्तांना श्रीलंकेत असलेल्या रामयण काळातील ठिकाणांना भेट देता यावी यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भारतीय रेल्नेने श्रीलंकेसाठी विशेष टूर पॅकेज 'रामायण' सुरू कण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमधून रामभक्तांना श्रीलंकेतील अशोक वाटिका, सीता माता मंदिर, भक्त हनुमान मंदिर, बिभिषण मंदिर आणि मुनिवरम शिव मंदिर आदी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
याबाबत माहिती देताना आयआरसीटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "या योजनेंतर्गत प्रवाशांना दिल्ली एअरपोर्टवरून श्रीलंकेत नेण्यात येईल. या योजनेची सुरुवात 24 नोव्हेंबरला होईल, तर पहिल्या फेरीतील टूरचा समारोप 29 नोव्हेंबला होईल. त्यानंतर 10 डिसेंबर, 12 जानेवारी, 10 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी टूरचे आयोजन होणार आहे."
पाच दिवसांच्या या टूरदरम्यान आयआरसीटीसीकडून व्हिसापासून विमान तिकीट, राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था केली जाईल. या संपूर्ण टूरसाठी आयआरसीटीसी प्रतिप्रवारी 48 हजार 200 रुपये एवढे शुल्क आकारणार आहे. तसेच या श्रीलंका सफरीत प्रवाशांना कोलंबो कँडी या श्रीलंकेतील प्रमुख शहरांमध्येही फिरवून आणण्यात येणार आहे.