नवी दिल्ली : देशातील बेरोजगारांसाठी एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षात रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली. येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली.
भारतीय रेल्वेत 2 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. सध्या रेल्वेत 1 लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. येत्या दोन वर्षात 1 लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सी व डी गटातील जागा आणि आता निघणाऱ्या जागा अशा सर्व मिळून येत्या दोन वर्षात जवळपास रेल्वेत 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, असे पीयुष गोयल यांनी सांगितले.
दरम्यान, 2 लाख 30 हजार नवीन जागांच्या भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख 31 हजार 428 जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ही जाहिरात येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील 99 हजार जागांसाठी 2020 मध्ये मे किंवा जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.