भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस खूप ऐतिहासिक होता. रेल्वेने कवच तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची आज चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली आहे. यासाठी १६० किमी प्रती तासाच्या वेगाने दोन ट्रेन एकमेकांच्या दिशेने येत होत्या. एका ट्रेनच्या इंजिनामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव होते. या ट्रेन एकमेकांपासून अवघ्या ३८० मीटरवर येऊन थांबल्या आणि सर्वांना हायसे वाटले.
रेल्वे मंत्र्यांनी याचे व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. सनतनगर-शंकरपल्ली विभागामध्ये ही चाचणी घेण्यात आली.
कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो.
जेव्हा ट्रेन अशा सिग्नलवरून जाते, जिथे तिला जाण्याची परवानगी नसते, तेव्हा त्यातून धोक्याचा सिग्नल पाठविला जातो. जर लोको पायलट ट्रेन थांबवण्यात अयशस्वी ठरला, तर 'कवच' तंत्रज्ञानाद्वारे ट्रेनचे ब्रेक आपोआप लागू होतात आणि ट्रेन कोणत्याही अपघातापासून वाचते. अधिकाऱ्याने सांगितले की, हे तंत्रज्ञान हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. यासोबतच, ते SIL-4 (सिस्टम इंटिग्रिटी लेव्हल-4) शी सुसंगत आहे, जे सुरक्षा तंत्राचा सर्वोच्च स्तर आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या बजेटमध्ये या कवच यंत्रणेची घोषणा करण्यात आली होती.