कोरोना काळात देशभरात फक्त रेल्वेचाच देशाला आधार होता. उंटीनीचे दूध असेल की कोरोना काळात मालवाहतूक सारे काही रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले. याचवेळी प्रवासी सेवा देखील ठप्प होती. काही काळाने रेल्वे वाहतूक सुरु करताना काही प्रोटोकॉल लागू करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे लोकांनी याकडे तशी पाठच फिरविली. आता जेव्हा रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत आहे, तेव्हा रेल्वेला किती कमाई झाली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. संसदेत यावर प्रश्न विचारण्यात आला होता.
सरकारने या प्रश्नावर उत्तर दिले आहे. भारतीय रेल्वेला गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले आहे. म्हणजेच महसूलात मोठी घट झाली आहे. तसेच रेल्वेने कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये काही कपात केली आहे का, यावर देखील उत्तर दिले आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले की, 2019-20 मध्ये रेल्वेला झालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत 2020-21 मध्ये एकूण 34,145 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण प्रामुख्याने प्रवासी आणि अन्य कोचिंग महसूलामध्ये झाली आहे.
2019-20 मध्ये प्रवासी वाहतुकीतून झालेल्या कमाईचा आकडा हा 50669.09 कोटी रुपये होता. तर 2021 मध्ये ही कमाई 15,248.49 एवढी झाली. याचा विचार करता रेल्वेला कोरोना काळात 35,420.60 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच कोचिंग महसुलातून 2019-20 मध्ये रेल्वेला 4640.79 कोटी रुपये मिळाले होते. तर 2021 मध्ये ही कमाई निम्म्याहून कमी म्हणजेच 2096.76 कोटी रुपये झाली आहे. रेल्वेला यात 2544.05 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मालवातुकीत फायदा2019-20 मध्ये रेल्वेला माल वाहतुकीतून 113487.89 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले. तर 2021 मध्ये फायदा झाला आहे. रेल्वेला यंदा 117231.82 कोटी रुपयांची कमाई झाली. म्हणजे 3743.93 कोटी रुपयांचा फायदा झाला. तर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही भत्त्यामध्ये कपात करण्यात आली नाही, असे उत्तर सरकारने दिला आहे.