रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतीमान आणि वातानुकूलित रेल्वेसेवाचा आनंद घेण्यासाठी प्रवासी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच, वंदे भारत ट्रेनलाही प्रवाशांची गर्दी होत आहे. बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या भारत देशात वंदे भारतनंतर आता अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. दिल्ली ते दरभंगा मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या ते बिहारमधील सीतामढी मार्गास ही ट्रेन जोडणार आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणपतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील दळणवळण गतीमान केलं जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील नवीन विमानतळाचे उद्घाटन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमृत भारत रेल्वेलाही व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे. वंदे भारत ट्रेनप्रमाणेच ही ट्रेनही सुसज्ज आणि प्रशस्त बैठकव्यवस्थेची असणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनमधील सुविधांचा आणि ही ट्रेन आतमधून कशी आहे, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या तो व्हिडिओ प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे.