Bullet Train:बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या काही वर्षांपासून बुलेट ट्रेनबाबत देशभरात अनेक चर्चा झाल्या आहेत. वास्तविक आताच्या घडीला बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप प्रकल्पाच्या कामालाही गती मिळालेली पाहायला मिळत नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पावरून विरोधकांनी मोदी सरकारवर अनेकदा टीका केली आहे. यातच आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला, असा थेट आरोप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये भारतीय रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले. त हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन आणि नवीन ट्रॅकवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मीडियाशी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाहीत. पण, शिंदे-भाजप सरकारने परवानग्या दिल्याने प्रकल्पाला गती आल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानग्या न दिल्यामुळे रखडला. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाहीत. मात्र, सरकार बदलताच आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने सर्व परवानग्या दिल्या असून प्रकल्पाला गती दिली जात आहे, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, गुजरातमधील आठ जिल्ह्यांतून दादरा आणि नगर हवेलीतून जाणाऱ्या समांतर मार्गावर बांधकाम सुरू झाले आहे. वर्षानुवर्षे अर्धवट अवस्थेत राहिल्यानंतर, महाराष्ट्रासह इतर शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाने अलीकडे वेग घेतला आहे. हा प्रकल्प २०२७ मध्ये पूर्ण होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात बंपर निधीची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेचे नवे मार्ग, नव्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या १०० महत्त्वाच्या योजना प्राधान्याने राबवल्या जाणार असून, रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यावर भर दिला जाणार आहेत. तसेच रेल्वेच्या विविध योजनांसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास आणखी गतीने व्हावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"