Vande Bharat Sleeper Version: देशभरात प्रचंड लोकप्रिय ठरलेली वंदे भारत एक्स्प्रेस ३४ मार्गांवर चालवली जात आहे. आतापर्यंत सीटिंग चेअरकार असलेल्या वंदे भारत चालवल्या जात आहेत. यातच आता स्लीपर वंदे भारत ट्रेनची निर्मिती वेगाने केली जात आहे. आगामी काही महिन्यात पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले जाऊ शकते. ही एक ट्रेन तयार करण्यासाठी रेल्वेला किती खर्च येतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत ट्रेनचे डिझाइन आणि प्रोटोटाइप तयार झाला आहे. वर्षअखेरीस स्लीपर कोच तयार होईल. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे कोच चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार केले जात आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू होईल आणि मार्च २०२४ पर्यंत प्रत्यक्ष ही ट्रेन सेवेत येईल, असे सांगितले जात आहे. ही ट्रेन कोणत्या मार्गावर चालवली जाईल आणि त्यांचा रंग पांढरा-निळा असेल की केशरी की आणखी काही याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
२० ते २२ डब्यांची स्लीपर वंदे भारत ट्रेन
स्लीपर वंदे भारत ट्रेनला २० ते २२ डबे असतील. स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या पहिल्या आवृत्तीत एकूण ८५७ बर्थ असतील, त्यापैकी ३४ जागा कर्मचाऱ्यांसाठी असतील. म्हणजेच एकूण ८२३ बर्थ प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. स्लीपर वंदे भारत हे पॅन्ट्री कारचा वेगळा डबा असणार नाही. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात एक मिनी पॅन्ट्री असेल, जी त्या विशिष्ट डब्यातील प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवेल. याच स्लीपर वंदे भारतच्या इंटिरिअरची एक झलक रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरून शेअर केली आहे. तसेच ही एक कन्सेप्ट असून, २०२४ च्या सुरुवातीलाच ट्रेन येऊ शकते, असे सूतोवाच अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या इंटिरिअरचे खास फोटो पाहण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस भारतीय रेल्वेच्या मॅकेनिकल इंजिनिअर्संच्या टीमने तयार केली आहे. विद्यमान १६ डब्ब्यांच्या एका वंदे भारत ट्रेनसाठी जवळपास ११५ कोटी रुपयांचा खर्च येत आहे. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची किंमत इंटिग्रल कोच फॅक्टरीने अंदाजे १२७ कोटी रुपये वर्तवली आहे. याच किमतीत वंदे भारतचे २०० ट्रेन सेट बनवले जाणार असल्याची चर्चा आहे.