नवी दिल्ली - रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. यापुढे रेल्वेमधील कर्मचाऱ्यांकडून घरकाम करून घेणे तात्काळ बंद करा, असे स्पष्ट आदेश रेल्वे मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याबरोबरच तसेच रेल्वे मंत्रालयाने आपला 36 वर्षांपासून चालत आलेला एक प्रोटोकॉलही मोडीत काढला आहे. ज्यानुसार रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि बोर्ड मेंबर्सच्या विभागीय दौऱ्यांदरम्यान महाव्यस्थापकांना त्यांचे स्वागत आणि निरोपासाठी उपस्थित राहावे लागत असे. रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात फेरबदल करताना रेल्वे बोर्डाने 1981 च्या त्या आदेशांना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यानुसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले होते. 28 सप्टेंबर रोजी रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आदेशांमध्ये रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि अन्य अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर उपस्थित राहण्याच्या प्रोटोकॉल संदर्भातील मार्गदर्शक तत्त्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. त्याबरोबरच रेल्वेचा कुठलाही अधिकारी बुके किंवा भेटवस्तू स्वीकारणार नाही, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले. रेल्वेचे सुमारे 30 हजार ट्रॅकमन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करत आहेत. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी घरगुती कामांसाठी ठेवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामातून मुक्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या आदेशानंतर गेल्या महिनाभरात सुमारे 6 ते 7 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. रेल्वेमधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,"अत्यंत खास परिस्थिती वगळता कुणालाही सुट देण्यात येणार नाही. सर्व कर्मचारी लवकरच कामावर परततील अशी अपेक्षा आहे." रेल्वे अधिकाऱ्यांनी आरामदारीय एक्झिक्युटिव्ह श्रेणी सोडून एसी-3 आणि स्लीपरमधून प्रवास करावा, असे आवाहनही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
रेल्वेतील व्हीआयपी संस्कृतीवर रेल्वेमंत्र्यांचा प्रहार, कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे करून घेऊ शकणार नाहीत अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 4:13 PM