नवी दिल्ली : केंद्र सरकारवर रेल्वेचे खासगीकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत या विषयावर विरोधकांवर निशाणा साधला. कोणीही कधी असे म्हटले नाही की, रस्त्यावर फक्त सरकारी वाहने धावली पाहिजेत. रस्ते सुद्धा राष्ट्रीय संपत्ती, त्यावर खाजगी गाड्या धावत नाहीत का? असे सांगत पीयूष गोयल यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (railway minister piyush goyal in lok sabha railway privatization national highway)
रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आमच्यावर रेल्वेचे खाजगीकरण केल्याचा आरोप आहे, परंतु कोणीही असे कधी म्हटले नाही की, रस्त्यावर फक्त सरकारी वाहनेच धावतात. कारण, खासगी आणि सरकारी दोन्हीही वाहने अर्थचक्र पुढे येतात. तसेच, पीयूष गोयल यांनी खासगी गुंतवणुकीचे रेल्वेमध्ये स्वागत करत त्यामुळे सुविधांमध्ये सुधारणा होईल, असे सांगितले. मात्र, रेल्वे पूर्णपणे खासगीकरणाच्या हातात रेल्वे देणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, रेल्वे ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारी राहील. परंतु यात जर खाजगी गुंतवणूक होत असेल तर त्यात कोणालाही अडचण होऊ नये, असे पीयूष गोयल म्हणाले.
आज आम्हाला रेल्वे स्थानकातील वेटिंग रूम, एस्केलेटर आणि अशा अनेक सुविधांची गरज आहे, त्यामुळे यासाठी गुंतवणुकीची आवश्यक असणार आहे. जवळपास 50 रेल्वे स्थानके निवडली आहेत, जी आधुनिक मार्गाने तयार केली जात आहेत, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. याचबरोबर, आता नवीन 44 वंदे भारत ट्रेन चालविण्यात येणार आहेत, याची ऑर्डर देण्यात आली आहे. लवकरच मार्ग निश्चित केले जातील आणि ट्रेन सुरू केल्या जातील, असे लोकसभेत पीयूष गोयल म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांकडून केंद्र सरकारवर सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण केल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. केवळ रेल्वेच नाही तर बँकांच्या खासगीकरणाचा आरोप केला जात आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी आणि मंगळवारी बँक युनियनचा संप आहे.