ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २५ - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेले रेल्वे बजेटमध्ये काहीही दम नसल्याचे सांगत भारताची लाईफलाईन असलेली रेल्वे भाजपा सरकारच्या काळात रुळांवरून घसरल्याची टीका माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी केली.
सुरेश प्रभू यांनी आज संसदेत बजेट सादर करताना येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वे ८.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असं सांगत भारतीय रेल्वे ही प्रत्येकासाठी गर्वाची बाब ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र या बजेटमधून सर्वसामान्यांना काहीही मिळाले नसल्याची टीका करत विरोधकांनी या बजेटबाबत तीव्र नाराजी दर्शवली.
माजी रेल्वेमंत्री असलेले लालूप्रसाद यादव यांनी प्रभूंच्या बजेवर टीकास्त्र सोडले. हे बजेट अतिशय हलके होते, त्यात काहीही दम नाही. आम्ही रेल्वेला जर्सी गाय बनवलं होतं. ही रेल्वे एकेकाळी देशाची लाइफलाईन होती, पण आता भाजपाच्या काळात हीच लाइफलाइन ट्रॅकवरून खाली उतरली आहे, अशी टीका त्यांनी केली.
तर या बजेटमध्ये बायोव्हॅक्युम टॉयलेट व्यतिरिक्त काहीही नवीन घोषणा नसून, हे कितपत यशस्वी ठरेल याबद्दल आपण साशंक आहोत, अशी प्रतिक्रिया माजी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी दिली.
बजेटशी संबंधित सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.