ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - रेल्वे आता रुळावर परतली आहे. पूर्वी लोक रेल्वेबद्दल नकारात्मक बोलायचे पण आता रेल्वेबद्दल लोक सकारात्मक मत व्यक्त करतात ही समाधानाची बाब आहे असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. गोष्टी वेगाने बदलत आहेत. सोशल मिडीया आणि अन्य माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत.
रेल्वेने आपल्यामध्ये जो बदल केला आहे त्याने कॉर्पोरेट सेक्टर आणि अनेक जागतिक कंपन्यांना आकर्षित केले आहे असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या उभारणीवर मोठया प्रमाणावर खर्च करत आहे. आम्ही ट्रेनचा वेगही वाढवला आहे तसेच तिकीट शुल्काव्यतिरिक्त जाहीराती आणि अन्य मार्गाने महसूली उत्पन्नही वाढवले आहे.
रेल्वेने आपली क्षमता वाढवली असून, यामुळे एक सकारात्मकता आली आहे असे प्रभू यांनी सांगितले. रुग्ण आयसीयूमधून बाहेर आल्यावर लगेच पळायला लागेल अशी अपेक्षा आपण रेल्वेकडून करु शकत नाही. रेल्वे आता आयसीयूमधून बाहेर आली असून, चालायला सुरुवात केली आहे. पण अजूनही भरपूर काळजी घेण्याची गरज आहे असे प्रभू यांनी सांगितले.