नवी दिल्ली: प्रवाशाला चुकीचा मेसेज पाठवणं आयआरसीटीसीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे प्रवाशाला 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ग्राहक मंचाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे रेल्वेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 29 मे रोजी अलाहाबादवरुन दिल्लीला जाणारी महाबोधी एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मेसेज रेल्वेकडून प्रवाशांना पाठवण्यात आला होता. ‘तिकिटाचे पैसे हवे असल्यास तिकीट रद्द करा,’ असा मेसेज रेल्वेकडून करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले. वैशाली येथे राहणाऱ्या विजयप्रताप सिंह यांचा मुलगा अक्षत अलाहाबादवरुन दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणार होता. रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांनी तिकीट रद्द केले. मुलाला जाणं गरजेचं असल्यामुळे त्याच्यासाठी कॅब बुक केली. मुलगा दिल्लीला पोहोचल्यावर त्याला धक्काच बसला. कारण महाबोधी एक्स्प्रेस रद्द न झाल्याचे त्याला समजले. महाबोधी एक्स्प्रेस वेळेवर दिल्लीला पोहोचल्याची माहिती त्याला मिळाली. विशेष म्हणजे, विजयप्रताप सिंह तिकीट रद्द करण्यास गेले असता केवळ एकाच तिकीटाचे पैसे त्यांना परत मिळाले. दुसरे तिकीट तत्काळमधील असल्याने रेल्वेने तिकिटाचे पैसे देण्यास नकार दिला, असे सिंह यांनी सांगितले. त्यानंतर सिंह यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. अखेर रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे सिंह यांना, शारिरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, अशा शब्दांमध्ये ग्राहक मंचाने सिंह यांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश चुकीचा मेसेज पाठवणा-या आयआरसीटीसीला दिले आहेत.
रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, प्रवाशाला रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज; 25 हजाराचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 2:16 PM