Railway Platform Ticket rates increased: सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी आणि रेल्वे आवारातील प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागातील काही निवडक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने सांगितले की, या कालावधीत ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार- मुंबईतील मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर ५० रूपये असतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल येथेही नवीन दर लागू होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. त्याशिवाय वापी, वलसाड, उधना आणि सुरत या रेल्वे स्थानकांवरही प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत. या स्थानकांवर आता ५० रुपयांना हे तिकीट उपलब्ध होणार आहे. या किमती तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमती ३१ ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर रेल्वेनेही प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले!
याआधी सणांच्या काळात प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढू नये म्हणून उत्तर रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट तिप्पट महाग केले होते. या बाबतची अधिसूचना जारी करताना उत्तर रेल्वेने दिल्लीपासून सर्व प्रमुख स्थानकांवर त्याची अंमलबजावणी केली. हा वाढीव दर ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत लागू असेल. सध्याच्या अधिसूचनेनुसार, १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर ३० रुपये करण्यात आला आहे.
दिल्लीच्या डीआरएमने ५ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नवी दिल्ली, जुनी दिल्ली, सराय रोहिल्ला, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद आणि आनंदविहार स्थानकांवर प्रवेशासाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच दीपावली ते छठ सणापर्यंतची गर्दी पाहता उत्तर रेल्वेच्या लखनौ, वाराणसी, बाराबंकी, अयोध्या कॅंट, अयोध्या, अकबरपूर, शहागंज, जौनपूर, सुलतानपूर, रायबरेली, जंघई, भदोही, प्रतापगढ आणि उन्नाव स्थानकांवरील तिकीट दर वाढवण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी हे दर १० रुपयांऐवजी ३० रुपये आहेत.