एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चारा घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर जेलबाहेर आलेले लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सीबीआयने रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लालू व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित पाटणा, दिल्ली, गोपालगंजसह देशातील अनेक शहरांत१७ ठिकाणांवर सीबीआयने छापे मारले आहेत.
पाटण्यात सकाळी ६.३० वाजता सीबीआय अधिकारी राबडीदेवी यांच्या १०, सर्क्युलर रोडवरील निवासस्थानी दाखल होताच खळबळ उडाली. छाप्याच्या वेळी पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राबडींच्या घरी दोन खोल्या कुलूपबंद होत्या. त्यांच्या किल्ल्या न मिळाल्यामुळे किल्ल्या करणाराला बोलवावे लागले.
रेल्वे भरती बोर्ड घोटाळ्यात नवीन पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयने नवीन गुन्हा दाखल केला आहे, असे सूत्रांनी सांगितले. लालू हे २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वेमंत्री होते. यावेळी त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. रेलटेल, आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपांचाही यात समावेश आहे. रेल्वेत मनमानी पद्धतीने लोकांना नोकरी देणे व त्या बदल्यात त्यांच्याकडून जमीन लाटल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सुमारे सहा तास राबडीदेवी यांच्या निवासस्थानी छापेमारी केल्यानंतर सीबीआय पथकाने त्यांची चौकशी करणार, असे सांगितले असता, राबडीदेवी म्हणाल्या की, हे काय प्रकरण आहे, ते कळेपर्यंत कोणताही जबाब नोंदवणार नाही. यानंतर पाच वकिलांचे पथक दाखल झाले. त्यांच्याशी कायदेशीर सल्लामसलत केल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी सीबीआयच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
नेमके प्रकरण काय?
- या प्रकरणी १८ मे रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला. लालूंनी रेल्वेमंत्री असताना २७६ जणांना कोणत्याही परीक्षेशिवाय रेल्वेत भरती केल्याचा आरोप आहे.
- एका तक्रारीच्या आधारे सीबीआयने कारवाई करीत उत्तर-पश्चिम रेल्वे झोनमध्ये या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण तपशील मागितला तेव्हा २०१९ मध्ये हे प्रकरण उघडकीस आहे.
- यातील काहींना राजस्थानच्या जयपूर, जोधपूर, अजमेर व बिकानेर मंडळात नियुक्ती देण्यात आली होती.