कोलकाता - पश्चिम बंगालच्या कोलकाता रेल्वे जंक्शन मार्गावरील रानाघाट रेल्वे स्थानकावर एक महिला गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह करत होती. रानू मंडाल असं या महिलेचं नाव असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फेसबुकवरुन या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर्स मिळाल्याने रातोरात प्रत्येकाच्या मोबाईल अन् मनामध्ये रानू दी यांनी आपले स्थान मिळवले होते. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील ये प्यार का नगमा है.. हे गाणं रानू दी यांनी गायिलं होतं. रानू दी यांच्या अंदाज आणि आवाजाने नेटीझन्स मंत्रमुग्ध झाले होते.
अतिशय हालाखीच्या परिस्थितीत, जगण्यासाठी दैनिक संघर्ष करणाऱ्या रानू दी यांचा व्हिडीओ एका तरुणाने शुट करुन फेसबुकवर अपलोड केला होता. त्यामुळे, रोजच्या रोजीरोटीसाठी झगडणाऱ्या रानू दी यांचे टॅलेंट जगासमोर आले. आपल्या मधूर आवाजातील त्यांची गाणी काही वेळातच सर्वत्र व्हायरल होऊ लागली. त्यामुळे रानू दी यांच्यावर म्युझिक कंपन्यांचीही नजर पडली. म्हणूनच, कोलकाता, मुंबई, केरळ, बांग्लादेश येथून रानू मंडाल यांना गाण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. तर, मुंबईतील एका रिअॅलिटी शोमध्येही ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी रानू यांचा मेकओव्हर करण्यात आला आहे. रानू यांचा प्रवासखर्च आणि इतर फॉर्मेलिटीही संबंधित कंपनीकडून करण्यात येत आहे. मात्र, रानू यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने काही अडचणी येत असल्याचे समजते. कदाचित, सा रे ग म प या शोमधून रानू दी यांना बोलावणे आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, बाबू मंडल यांच्याशी रानू यांचा विवाह झाला होता. मात्र, पतीच्या निधनानंतर त्या रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन लोकांचा मनोरंजन करत आपली भूक भागवत होत्या.
मळकट कपडे, राबलेला चेहरा, विस्कटलेले केस या पेहरावातून रानू दी आता उच्च भ्रू महिलांप्रमाणे नटून-थटून जगासमोर आल्या आहेत. रानू दी यांचे हे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, एका ब्युटी पार्लरमध्ये त्यांचा मेकअप करण्यात येत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियामुळे रानू दी यांचे नशिब पालटले असून आता त्यांना अच्छे दिन आले आहेत.