नवी दिल्ली : गर्दीचा फायदा तसेच प्रवासी बेसावध असताना किंवा अंधाराचा फायदा घेऊन रेल्वेमध्ये चोरी करण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये 1.71 लाख चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. दरम्यान, माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही रेल्वेतील सुरक्षेतेची माहिती समोर आली आहे.
यानुसार, रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, "दररोज सरासरी 2,500 मेल, एक्सप्रेस गाड्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा विशेष दल यांच्या सुरक्षा हाताळली जाते. याशिवाय जवळपास 2200 रेल्वे गाड्यांची सरकारी रेल्वे पोलीस स्टाफकडून सुरक्षा पाहिली जाते."
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक चोरीच्या घटना 2018 मध्ये झाल्याची नोंद आहे. 2018 मध्ये 36,584 चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर, 2017 मध्ये 33044, 2016 मध्ये 22106, 2015 मध्ये 19215, 2014 मध्ये 14301, 2013 मध्ये 12261, 2012 मध्ये 9292, 2011 मध्ये 9653, 2010 मध्ये 7549 आणि 2009 मध्ये 7010 चोरीच्या घटना घडल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने सांगितले होते की, मागील चार वर्षात रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळल्याप्रकरणी 73837 तृतीयपंथीयांना अटक केली होती. 2015 ते जानेवारी 2019 या काळात रेल्वे पोलिसांनी 73837 तृतीयपंथीयांना रेल्वे प्रवाशांना लुटल्याच्या अथवा त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केली होती.
2015 मध्ये 13546, 2016 मध्ये 19800, 2017 मध्ये 18526 तर 2018 मध्ये 20566 तृतीयपंथी गुन्हेगारांना रेल्वे प्रवाशांची लूट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले होते.