लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी रेल्वेने आता आधी तिकीट काढा, पैसे नंतर द्या, अशी नवी सेवा सुरू करण्याचे ठरविले असून, आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकीट मिळणार आहे. डिजिटल पेमेंट स्वीकारणारी ही पहिली सरकारी वेबसाइट आता पूर्णपणे कॅशलेस झाली आहे. या सेवेमुळे प्रवासाच्या पाच दिवस आधी तिकीट बुकिंग केल्यानंतर १४ दिवसांनंतर तिकिटाचे पैसे देता येणार आहेत. या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के इतका सेवाकर मात्र घेण्यात येणार आहे. या सेवेसाठी आयआरसीटीसीने मुंबईतील ई-पेलॅटर या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. आयआरसीटीसीच्या या सेवेमुळे प्रवाशांना आता तिकीट बुकिंगच्या वेळी लगेचच पैसे द्यावे लागणार नाहीत. या कॅशलेस बुकिंगचा फायदा आतापर्यंत ५0 जणांनी घेतला असल्याची माहिती आयआरसीटीसीचे प्रवक्ते संदीप दत्ता यांनी दिली आहे. मात्र १४ दिवसांत प्रवाशांनी तिकिटाचे पैसे न भरल्यास, त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल. तसेच एखादा प्रवासी सतत असे करीत असल्याचे आढळल्यास त्याला आयआरसीटीसीच्या या सेवेचा फायदा कधीही मिळणार नाही.आयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला किती रुपयांपर्यंत तिकीट क्रेडिटवर द्यायचे, याचा निर्णय पूर्णपणे ई-पेलॅटरकडून घेतला जाणार आहे. ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री, डिजिटल फुटप्रिंट, डिव्हाइस इन्फर्मेशन आणि आॅनलाइन खरेदीच्या पॅटर्नवर इ-पेलॅटर हा निर्णय घेणार आहे. एखाद्या ग्राहकास क्रेडिट कार्ड देताना त्याची पत पडताळणी केली जाईल. ज्यांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांना आपले नाव, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, पॅन कार्ड किंवा आधार क्रमांक अशी सर्व माहिती द्यावी लागणार आहे. तसेच पत पडताळणी केल्यानंतर ग्राहकास ही कॅशलेस सेवा वापरण्याची मुभा मिळाली की त्याला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) पाठविला जाईल. त्या ओटीपीच्या आधारे त्याला पुढील व्यवहार करता येईल.
पैसे न भरताच रेल्वे तिकिटाचे बुकिंंग
By admin | Published: June 25, 2017 12:27 AM