ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - तिकिटासाठी लागणा-या लांब रांगाची कटकट संपवण्याच्या दृष्टीने रेल्वेने महत्वाचं पाऊल उचललं असून लवकरच बँकेतही रेल्वे तिकीट मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने एप्रिल 2016 पासून यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली असून, प्रवाशांना जनरल तिकीट बँकेतच उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ही सुविधा सुरु करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे, यासाठी रेल्वे स्टेट बँक ऑफ इंडियाशी चर्चा करत आहे.
एप्रिल 2017 पर्यंत ही योजना सुरु होईल असा अंदाज असून त्यानंतर ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. या नव्या उपक्रमासाठी बँक दोन पर्यायांचा विचार करत आहे. एकतर बँकेच्या परिसरात वेंडिंग मशिन बसवण्यात यावी, जिथून प्रवाशांना तिकीट उपलब्ध होऊ शकते. तर दुसरा पर्याय म्हणजे एटीएममध्ये काही बदल करुन त्याला रेल्वे तिकीट वाटप यंत्रणेशी जोडणे.
यामुळे रेल्वे तिकीट मिळणं खूप सोपं होईल असं रेल्वेचं म्हणणं आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटरवर येणारा भार कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी तर बस स्टँड, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणांवरुन रेल्वे तिकीट विक्री आधीच सुरु करण्यात आली आहे.