नवी दिल्ली - Railway unions Strike ( Marathi News ) जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सातत्याने देशभरात अनेक कामगार संघटना आंदोलन करत आहेत. त्यात आता रेल्वे कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात उतरण्याचं ठरवलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे देशभरात रेल्वे सेवा ठप्प होण्याचीही शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी १ मेपासून बेमुदत संप करणार अशी घोषणा संघटनांनी केली आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसह अनेक कामगार संघटना एकत्र आल्यात. त्यात रेल्वे एम्पलॉईज आणि वर्कर्सच्या विविध संघटना आहेत. जाँईट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ ऑल्ड पेन्शन स्कीम अंतर्गत या संघटना एकजूट झाल्यात. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर १ मे पासून देशभरात रेल्वे सेवा ठप्प करू असा इशारा या संघटनेने दिला आहे.
याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात आरोप केलाय की, सरकारने नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना सुरू करावी. आम्ही ही मागणी करतोय परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अशावेळी आमच्याकडे संपाशिवाय कुठलाही मार्ग नाही. विविध रेल्वे संघटना फोरमच्या बॅनरखाली १९ मार्चपासून रेल्वे मंत्रालयाला नोटीस पाठवून संपाबद्दल माहिती देतील. ज्यात संपामुळे देशातील रेल्वे सेवा ठप्प होऊ शकते असं सांगितले जाईल. या संपात रेल्वे कर्मचाऱ्यांसह इतरही सरकारी कर्मचारी असतील अशी माहिती संयुक्त फोरमचे संयोजक गोपाल मिश्रा यांनी दिली आहे.
दरम्यान, १ मे रोजी कामगार दिन असल्याने हा महत्त्वाचा दिवस आहे. आम्ही जुनी पेन्शन लागू करावी यासाठी अनेकदा निदर्शने केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही पत्र पाठवून आग्रह धरला आहे. प्रत्येक बैठकीत आम्ही या मुद्द्यावर जोर देत आहोत. सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे असं या संयुक्त कामगार संघटनांनी म्हटलं आहे.