नवी दिल्ली: रेल्वेकडून लवकरच काही राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील एसी 2 टायर डब्यांची जागा एसी 3 टायर डबे घेणार आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये हे बदल केले जाणार आहेत. एसी 3 टायर कोचला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत असल्यानं रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट आरक्षित करुन प्रवास करणारे बहुतांश प्रवासी एसी 3 टायरमधूनच प्रवास करतात. त्यामुळे एसी 3 टायरमधून रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो. त्यामुळे काही एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी 2 टायरची जागा लवकरच एसी 3 टायर कोचेस घेतील. 'एसी 3 टायरला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळते. त्यामुळे या कोचेसमधून रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळतं,' अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं 'फायनान्शियल एक्स्प्रेस'ला दिली. एसी 2 टायरला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यानंही एसी 3 टायरला रेल्वेकडून प्राधान्य दिलं जातं आहे. 2016 मध्ये फ्लेक्सी फेअर/डायनामिक प्रायझिंग आणल्यापासून एसी 2 टायरला प्रवाशांची फारशी पसंती मिळताना दिसत नाही. 'एसी 2 टायरची जागा लवकरच एसी 3 टायर कोचेस घेतील. त्यासाठी राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेसच्या मार्गांचा अभ्यास सुरू आहे. विमान कंपन्यांमुळे कोणत्या मार्गांवर एसी 2 टायरला फारसा प्रतिसाद मिळत नाही, तेदेखील पाहिलं जाईल,' अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 'फ्लेक्सी फेअर स्किममुळे अनेकदा एसी 2 टायर आणि फर्स्ट क्लास एसीचे तिकीट विमान तिकीटापेक्षा महाग होतं. मग अशावेळी लोक रेल्वेला पसंती का देतील?,' असा प्रश्न रेल्वेच्या अधिकाऱ्यानं उपस्थित केला. त्यामुळेच एसी 3 टायर कोचेसची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतल्याचं त्यानं सांगितलं.
राजधानी, दुरांतोमधील एसी 2 टायरची जागा आता एसी 3 टायर घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 10:31 AM