नवी दिल्ली - प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात. अधिकृत रेल्वे एजंटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे कारण आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर प्रवाशांना रिफंड मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसी ओटीपी आधारित प्रणाली आणली आहे.
प्रवाशांना टिकीट कॅन्सल करण्यासाठी आयआरसीटीसीच्याद्वारे देण्यात आलेल्या पासवर्डच्या मदतीने रिफंड मिळण्याची सुविधा देण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) ही सुविधा केवळ अधिकृत एजेंटच्या माध्यमातून बूक करण्यात येणाऱ्या ई-तिकीटांवर लागू असणार असल्याची माहिती दिली आहे. ओटीपी आधारित रिफंड प्रक्रिया ही प्रवाशांच्या फायद्याची आहे. त्याचबरोबर यामुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणार आहे.
नव्या सुविधेमध्ये जेव्हा एखादा प्रवासी अधिकृत आयआरसीटीसी एजेंटच्या माध्यमातून बूक केलेली तिकीट किंवा वेटलिस्ट तिकीट कॅन्सल करत असेल तर त्याला त्याचे रिफंड पैसे आणि वन टाईम पासवर्ड (ओटीपी) चा एक मेसेज मोबाईल नंबरवर येईल. प्रवाशांना रिफंडसाठी तो ओटीपी ज्या एजेंटने तिकीट बूक केलं आहे त्याला द्यावा लागणार आहे. त्यानंतर पैसे रिफंड मिळणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत एजेंटच्या माध्यमातून दररोज जवळपास 27 टक्के तिकीट बूक केली जातात. तर यातील 20 टक्के तिकीट कॅन्सल देखील केली जातात.
काही दिवसांपूर्वी लखनऊ दरम्यान चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेच्या सहाय्यक कंपनी आयआरसीटीसीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये तेजस एक्सप्रेस ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी प्रवाशांना भरपाई देणार आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, तेजस ट्रेनला तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये मिळणार आहे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये प्रवाशांना भरपाई म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तेजस ट्रेनमध्ये पुरेसे प्रवासी प्रवास करत नसल्याने आयआरसीटीसीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.