नवी दिल्ली : रेल्वे अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर क्षमता विस्तारावर भर देताना त्यावरील तरतूद वाढवून १.२५ लाख कोटी रुपये केले जाण्याची शक्यता आहे. यातील मोठा वाटा रल्वे अर्थसंकल्पातील इतर स्रोतांकडून जमविला जाईल.२०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प गुरुवारी म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. रेल्वेत सुरक्षा व्यवस्था चांगली करणे, विद्युतीकरण, मार्गांचे दुहेरीकरण आणि यार्डाचे आधुनिकीकरण करण्यासाठी तरतुदीत उल्लेखनीय वृद्धी केली जाण्याची शक्यता आहे; मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अर्थसंकल्पबाह्य संसाधनावर (ईबीआर) अवलंबून राहावे लागेल. संसाधने जमा करण्याच्या आपल्या योजनांपासून ते रेल्वे अर्थसंकल्पात सविस्तर तपशील जाहीर करतील. रेल्वेच्या अपेक्षेप्रमाणे सर्वसाधारण अर्थसंकल्पातून पुरेसे आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विविध प्रकल्पांसाठी जास्तीच्या वित्तीय साह्यासाठी अर्थसंकल्पबाह्य (ईबीआर) स्रोतांवर अवलंबून राहावे लागेल. सूत्रांनी सांगितले की, रेल्वे आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक प्रकल्पच कार्यान्वित करणार आहे. याबाबत प्रभू यांनी १८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशा रेल्वे प्रकल्पात भागीदारी करण्याचे आवाहन केले आहे.