- रघुनाथ पांडे, नवी दिल्लीशोले, दी बर्निंग ट्रेनपासून अगदी चेन्नई एक्स्प्रेसपर्यंतच्या चित्रीकरणात रेल्वेची ‘भूमिका’ एखाद्या लोकप्रिय अभिनेत्यापेक्षाही वरचढ. शाहरुख अथवा सलमानही त्यांच्या यशस्वीतेचे रहस्य रेल्वेतच शोधत असतात, तरी गेल्या दोन वर्षांत रेल्वेची कमाई निम्म्याने कमी झाली आहे. २०१२-१३ मध्ये शूट आऊट अॅट वडाळा, द लंच बॉक्स, चेन्नई एक्स्प्रेस, गुंडे, रमय्या वस्तावय्या, हिम्मतवाला, वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन यासह बीबीसीच्या ‘मुंबई रेल्वे’ या माहितीपटांसह २६ चित्रपटांचे चित्रीकरण व सात मालिकांमध्ये रेल्वे झळकली. गेल्या वर्षी व यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत कमी प्रतिसाद मिळाला.२०१२-१३ या वर्षात सहा कोटी नऊ लाख, २०१३-१४ मध्ये सहा कोटी ७४ लाख, २०१४-१५ मध्ये तीन कोटी २ लाख व यंदा पहिल्या चार महिन्यांत म्हणजे जुलैपर्यंत ६६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकीकडे अशी स्थिती असताना रेल्वेच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. साहजिकच चित्रीकरणाच्या प्रभारात वाढ करण्याची योजना रेल्वे तयार करीत आहे, अशी शक्यता अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मुंबई व दक्षिणेतील चित्रपटांमध्ये रेल्वेचा सर्वाधिक वापर होतो. मध्य रेल्वेच्या खात्यात त्यामुळे काही कोटींचे उत्पन्न जमा होते. २०११ मध्ये १३ चित्रपटांच्या चित्रीकरणातून ६१ लाख, तर २०१२ एक कोटी रु पयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. मुंबई व उपनगरांतील रेल्वेस्थानके, वाडीबंदर, लोणावळा व पुणे या ठिकाणी चित्रीकरणासाठी सव्वा लाख रु पये दर आकारला जातो.चित्रीकरणाचा ‘ट्रॅक’-चित्रीकरणासाठी सुरुवातीला विमा व सुरक्षा ठेवेची आवश्यकता नव्हती. बर्निंग ट्रेनच्या चित्रीकरणादरम्यान दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेने संभाव्य धोके, नुकसान, प्रवासी वेळा व वाहतुकीचा विचार परवानगी देताना सुरू केला. - ‘अछुत कन्या’ चित्रपटात १९३६ साली रेल्वेचा सर्वप्रथम वापर झाला. रेल्वेचे सर्वात महागडे दृश्य ‘रु प की रानी, चोरों का राजा’मध्ये होते. -‘शोले’ चित्रपटात रेल्वेवरचा दरोडा चित्रित करण्यासाठी हॉलीवूडच्या तज्ज्ञांना बोलावले होते. -‘तेरे नाम’ने सलमानचे आयुष्य बदलून टाकले. त्यानंतर‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘दबंग २’ व‘किक’मध्ये ‘रेल्वे’ परिसर दिसले. अलीकडे ‘बजरंगी भाईजान’साठीही त्याने खास रेल्वे परिसरात चित्रीकरण केले आहे.
रेल्वेच्या कमाईला चित्रपटांकडून कात्री!
By admin | Published: September 06, 2015 4:08 AM