मेरठ- सहारनपूरच्या ग्राहक न्यायालयाने तिकिटावर चुकीची तारीख छापल्याप्रकरणी रेल्वेला दंड आकारला असून प्रवाशाला भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. विष्णुकांत शुक्ला असं प्रवाशाचं नाव असून त्यांनी 2013 साली ट्रेनने प्रवास केला होता. त्यावेळी 2013 च्या ऐवजी तब्बल 1 हजार वर्ष पुढची तारीख त्यांच्या तिकिटावर छापण्यात आली होती. प्रवासादरम्यान, तिकिट चुकीचं आहे सांगत टीसीने विष्णुकांत शुक्ला यांना ट्रेनमधून खाली उतरवलं. या प्रकरणी 73 वर्षीय शुक्ला यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला आहे.
विष्णुकांत शुक्ला निवृत्त प्रोफेसर आहेत. ते 19 नोव्हेंबर 2013 रोजी हिमगिरी एक्स्प्रेसने सहारनपूरपासून जौनपूर प्रवास करत होते. प्रवासादरम्यान टीसीने त्यांच्या तिकीटावरील तारीख २०१३ ऐवजी ३०१३ असल्याचं पाहिलं आणि मुरादाबाद येथे त्यांना जबरदस्तीने ट्रेनमधून खाली उतरवलं.
‘मी जे व्ही जैन डिग्री कॉलेजमध्ये हिंदी विभागाचा प्रमुख होतो. मला इतकंच सांगायचं आहे की मी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांपैकी नाही. पण तरीही टीसीने सर्वांसमोर मला तुच्छ वागणूक देत माझा अपमान केला. त्याने माझ्याकडे ८०० रुपये दंड भरण्याची मागणी केली. मला ट्रेनमधून उतरायला लावलं. माझ्या मित्राच्या पत्नीचं निधन झालं असल्या कारणाने मला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं’, अशी माहिती विष्णुकांत शुक्ला यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
सहारनपूरला परतल्यानंतर शुल्का यांनी रेल्वेच्या विरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल 5 वर्षांनी लागला आहे. 73 वर्षीय शुक्ला यांच्या बाजून निर्णय देत कोर्टाने रेल्वेला 10 हजार रूपये दंड आकारला असून तीन हजार रूपये नुकसाना भरपाई म्हणून शुक्ला यांना देण्याचे आदेश दिले आहेत.