पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नुकतेच मोठे बदल करण्यात आले. यात अश्विनी वैष्णव यांना देशाचे नवे रेल्वेमंत्री नियुक्त करण्यात आलं. मंत्रालयात पदभार स्वीकारताच रेल्वे मंत्रालयात काही महत्वपूर्ण बदल त्यांनी केले. रेल्वे मंत्रालयाच्या ऑफीसची कामकाजाची वेळ त्यांनी बदलली. याच दरम्यान रेल्वेमंत्र्यांची एका इंजिनिअरसोबत भेट झाली आणि याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
IAS अधिकारी, अटलजींचे 'सेक्रेटरी' आणि आता केंद्रात मंत्री... अश्विनी वैष्णव यांना मोठी संधी
नवनिर्वाचित रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी रेल्वेत सिग्नल विभागाच्या एका इंजिनिअरची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात इंजिनिअरनं आपण त्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत जिथं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचंही शिक्षण झालं आहे याची कल्पना रेल्वेमंत्र्यांना दिली. मग क्षणार्धात अश्विनी वैष्णव यांनी इंजिनिअरची गळाभेट घेतली.
"आपल्या महाविद्यालयात ज्युनिअर, सीनिअरला सर नव्हे, तर बॉस बोलण्याची पद्धत होती. तर मग आता तुम्हीही मला बॉस बोलणार का?", असं अश्विनी वैष्णव यांनी मिश्किलपणे म्हटलं. त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर जुन्या आठवणींनी हास्य फुललं.
भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान, नियम पाळावेच लागतील; अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला रोखठोक इशारा
आयएएस राहिलेल्या अश्विनी वैष्णव यांचं राजस्थानच्या जोधपूर येथील एमबीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं आहे. रेल्वे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अश्विनी वैष्णव यांनी यावेळी आपलं घर समजून काम करा, जेणेकरुन काम करताना आनंद निर्माण होईल व चांगलं काम होईल असं आवाहन केलं.
दरम्यान, रेल्वे मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच अश्विनी वैष्णव यांनी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल केले. नव्या आदेशानुसार रेल्वे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे. यात पहिली शिफ्ट सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुपारी ४ वाजता संपणार आहे. तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ वाजता सुरू होऊन रात्री १२ वाजता संपणार आहे.
माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला
देशातील महत्वाच्या मंत्रालयांपैकी एक असलेल्या रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचीही धुरा सोपविण्यात आली आहे. याआधी रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पियूष गोयल यांच्याकडे होती. आता त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. त्याआधी हे खातं स्मृती इराणी यांच्याकडे होतं.