नवी दिल्ली : श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 30 डिसेंबरला अयोध्येत होणार आहे. याच दिवशी नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत ट्रेनला (Amrit Bharat Train) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अयोध्या ते बिहारमधील सीतामढी दरम्यान धावणारी अमृत भारत ट्रेन ही भारतातील पहिली अमृत भारत ट्रेन असणार आहे.
सर्व सामान्यांसाठी असलेल्या या विशेष ट्रेनची चाचणी गेल्या महिन्यात घेण्यात आली. ही पुल-पुश ट्रेन आहे, जी खूप लवकर वेग पकडते. अमृत भारत ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहे. अमृत भारत एक्सप्रेसचा रंग भगवा आहे. या ट्रेनचे इंजिन वंदे भारत आणि ईएमयूच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. विशेष म्हणजे ट्रेन पूर्णपणे भगव्या रंगाची असणार आहे. कोचच्या खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा आहे.
देशातील कामगार, कष्टकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून अमृत भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. यात स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असतील. अमृत भारत ट्रेनमध्ये 22 डबे असतील. यात 12 द्वितीय श्रेणी 3 टियर स्लीपर कार, 8 सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि दोन गार्ड कोच असू शकतात. ट्रेनमध्ये अंदाजे 1,800 प्रवाशांना प्रवास करण्यासाठी जागा असणार आहे.
अमृत भारत ट्रेन ही पुल-पुश ट्रेन आहे. म्हणजे एक इंजिन ट्रेनच्या पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला असणार आहे. पुल-पुश टेक्नॉलॉजीमुळे अमृत भारत ट्रेन जलद गतीने पिकअप घेऊ शकेल आणि वेग वाढेल. समोरचं इंजिन ट्रेनला ओढतं आणि मागचं इंजिन ट्रेनला ढकलतं. समोरच्या इंजिनमधून लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट ट्रेन चालवतात. टेक्नॉलॉजीच्या भाषेत याला पुश-पुल लोकोमोटिव्ह म्हणतात.
अमृत भारत ट्रेनचे भाडे फार जास्त असणार नाही. कारण सर्वसामान्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे भाडे सामान्य ठेवण्यात येणार आहे. ट्रेनच्या आसनांसह मोबाईल चार्जर आणि बॉटल होल्डर देखील असणार आहे. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणार आहे. विशेषतः अशा मार्गांवर जिथे कामगार आणि मजूर खूप प्रवास करतात.
देशातील पहिली अमृत भारत ट्रेन रामनगरी अयोध्या ते माता सीतेची जन्मभूमी मिथिला यादरम्यान जोडली जाणार आहे. अयोध्येहून पहिली अमृत भारत ट्रेन दरभंगामार्गे सीतामढीला पोहोचेल. अयोध्येपासून सीतामढी ५७२ किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे. भविष्यात अयोध्येपासून देशाच्या इतर भागांमध्येही नवीन गाड्या चालवल्या जाऊ शकतात.