ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आता प्रवाशांच्या समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेकडून एक मोबाईल अॅप सुरु करण्यात आले आहे. रेल सारथी (Rail SAARTHI) असे या अॅपचे नाव असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुक्रवारी या अॅपचे लॉंचिग करण्यात आले.
रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून आता प्रवाशांना रेल्वे प्रवासासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहे. याआधी एखाद्या प्रवाश्याला रेल्वेसंबंधी तक्रार करायची असल्यास अनेक अडचणी येत होत्या. ही तक्रार कोणाकडे आणि कशी करावी. तसेच, तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते, यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र आता तसे होणार नाही कारण, रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. याचबरोबर, या मोबाईल अॅपवरुन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकिट बुकींग करता येते. तसेच, प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांची ऑर्डर, रेल्वेचे टाईम टेबल आणि विशेष म्हणजे रेल्वेचे लोकेशन सुद्धा या अॅपमधून पाहता येणार आहे. रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थानाची वेळ, प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेनला होणारा उशीर, रद्द गाड्या, आसन व्यवस्था यांची माहितीही मिळणार आहे.
त्यासोबतच या अॅपवरून टॅक्सी, पोर्टस सर्व्हिस, रिटायरिंग रूम हॉटेल, टूर पॅकेज, ई कॅटरिंग आदींचे बुकिंग करता येणार आहे. रेल्वे या सेवा, संबंधित आस्थापनांशी मिळकत वाटणीच्या मॉडेलच्या आधारावर उपलब्ध करून देईल. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी किमान 100 कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रेल सारथी अॅप लॉन्च करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी सरकारकडून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु आहे. तसेच, रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या सेवा सुविधेबाबत प्रवाशांनी प्रतिक्रिया पाठवाव्यात.