नवी दिल्ली : नवी पेन्शन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची समीक्षा करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचारी संघटनांनी येत्या ११ जुलैपासून देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.‘या बेमुदत संपाबाबत आम्ही आज गुरुवारी रेल्वे प्रशासनाला नोटीस देणार आहोत. आमचा हा संप ११ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल,’ अशी माहिती अखिल भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाचे (एआयआरएफ) सरचिटणीस एस. गोपाल मिश्रा यांनी दिली. ‘सहा महिन्यांपूर्वी आम्ही सादर केलेल्या आमच्या मागण्यांवरील सरकारची भूमिका पाहता, हा बेमुदत संप आता अटळ आहे,’ असा दावाही मिश्रा यांनी केला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या आधी गेल्या एप्रिलमध्ये आयोजित केलेला संप मागे घेतला होता. रेल्वेत सध्या १३ लाखांवर कर्मचारी आहेत आणि रेल्वेत संप पुकारण्यात आल्यास त्याचा रेल्वे सेवेवर मोठा परिणाम होईल आणि प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.नवी पेन्शन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची समीक्षा करण्यात यावी, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय रेल्वेत रिक्त असलेली अनेक पदे भरण्यात यावी, ही मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे. नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेमनचे सरचिटणीस एम. राघवय्या यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. गुरुवारी सर्व झोनल जनरल मॅनेजर्सना संपाची नोटीस देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>पहिला रेल्वे संप १९७४ सालचादेशात पहिल्यांदा रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केला होता १९७४ साली. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ साली सुरू झालेला हा रेल्वे संप २८ मेपर्यंत म्हणजे तब्बल २१ दिवस चालला होता.या काळात सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने देशभरातील संपूर्ण रेल्वेसेवा पूर्णपणे बंद पडली होती. त्यानंतर, अनेकदा रेल्वे संपाच्या घोषणा करण्यात आल्या, पण प्रत्यक्षात देशव्यापी संप एकदाही झाला नाही.
११ जुलैपासून रेल्वेचा बेमुदत देशव्यापी बंद?
By admin | Published: June 09, 2016 5:10 AM