नवी दिल्ली: देशभरात स्वच्छता अभियान राबवूनही लोकांची मानसिकता बदलत नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवा, असं आवाहन सरकारकडून करण्यात येतं. मात्र रस्त्यांपासून रेल्वेपर्यंत सगळीकडेच कचरा टाकला जातो. पान, तंबाखूच्या पिचकाऱ्या मारल्या जातात. यामुळे परिसर अस्वच्छ तर होतोच, त्यासोबतच आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होतात. भारतीय रेल्वे गुटख्यामुळे होणारी घाण स्वच्छ करण्यासाठी वर्षाकाठी जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करते. रेल्वे गाड्या आणि स्थानकं स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी लाखो लीटर पाणीदेखील वापरण्यात येतं.
अनेक आवाहनं, विनंत्या करूनही प्रवासी रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये थुंकणं बंद करत नाहीत. अशा लोकांसाठी आता रेल्वेनं नवा उपाय शोधला आहे. रेल्वे स्पिटून (पिकदाणी), कियोस्क लावण्याच्या तयारीत आहे. याठिकाणाहून प्रवासी स्पिटून पाऊच खरेदी करू शकतात. त्याची किंमत ५ ते १० रुपये असेल. सुरुवातीला देशात ४२ स्थानकांमध्ये अशा प्रकारचे स्टॉल सुरू करण्याची योजना आहे.
रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि उत्तर विभागानं नागपुरातल्या ईझीस्पिट या स्टार्टअपला स्पिटून पाऊचच्या निर्मितीचं कंत्राट दिलं आहे. या पीकदाणीला प्रवासी सहज आपल्या खिशात ठेऊ शकतात. यामध्ये प्रवासी थुंकू शकतात. या बायोडिग्रेडेबल पाऊचचा वापर १५ ते २० वेळा करता येऊ शकेल. संपूर्ण वापर झाल्यावर पाऊच मातीत टाकता येईल. हे पाऊच मातीत पूर्णपणे मिसळेल. त्यामुळे प्रदूषणाची समस्या उद्भवणार नाही.
नागपूरस्थित ईझीस्पिट या स्टार्टअपनं रेल्वे स्थानकांवर वेंडिंग मशीन्स लावण्यात आल्या आहेत. या कंपनीसोबत नागपूर आणि औरंगाबाद महानगरपालिकेनं करार केला आहे. 'आम्ही मध्य, उत्तर आणि पश्चिम रेल्वेच्या ४२ स्थानकांसाठी भारतीय रेल्वेसोबत करार केला आहे. काही स्थानकांवर ईजीस्पिट वेंडिंग मशीन्स लावण्यात सुरुवात केली आहे,' अशी माहिती ईझीस्पिटच्या सहमालक रितू मल्होत्रा यांनी सांगितलं.