नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवेंनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांच्या रेल्वे प्रवासाबाबत मोठी घोषणा केली आहे. मागील वर्षभरापासून कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येतो.
याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अन्न पुरवठा खात्यातही चांगले काम केले. या देशातील ८० कोटी जनतेला २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ देण्याचं काम सरकारने केले. आता रेल्वे खात्याची जबाबदारी मिळाली आहे. ब्रिफिंग घेऊन सध्या काय स्थिती आहे आणि यापुढे रेल्वे खात्यासाठी काय करावं लागेल हे सांगता येईल. महाराष्ट्रातील गरजा, मराठवाडा यासाठी काय करता येईल यावर माझं प्राधान्य असेल असं दानवेंनी सांगितले.
आजच मी खात्याचा कारभार स्वीकारला आहे. पुढची दिशा काय असेल ते अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सांगू शकतो. रेल्वे हे सर्वसामान्यांच्या गरजेचे वाहतुकीचं साधन आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुविधा देण्यावर प्राधान्य असेल. लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारली आहे. जेव्हा कधी राज्य सरकारला वाटेल कोरोना स्थिती आटोक्यात आली आहे, रेल्वे सेवा सुरू करायला हवी तेव्हा राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठवावा. त्यावर अभ्यास करून लोकल सेवा सुरू करू त्यात काही अडचण नाही असंही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टपणे सांगितले. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अलीकडेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्वसामान्यांच्या मुंबई लोकल प्रवासाबाबत भाष्य केले होते. विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. गर्दीचं ठिकाण आहे. त्यामुळे कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.
कसा करावा लागतो लोकल प्रवास?
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मर्यादित पातळीवर मुभा देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढवल्यावर पुन्हा एकदा लोकल प्रवासबंदी करण्यात आली. कोरोनाच्या काळात लोकल प्रवासास बंदी असल्यामुळे अनेक प्रवाशांकडून बोगस ओळखपत्र दाखवून प्रवास करत असल्याच्या घटना समोर आल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ऑनलाइन यंत्रणेद्वारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच या कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर क्युआर कोड येणार आहे. हा क्युआर कोड रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवल्यानंतरच सदर कर्मचाऱ्यांना पास मिळणार असून, तसा निर्णय व नियोजन राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अधिकारपत्र दाखवून एकात्मिक पास मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील एक पत्रही रेल्वेला दिल्याची माहिती मिळाली आहे.