कोलकाता – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेल्या लोकल सेवा येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत. पश्चिम बंगालमध्येलोकल सेवा पूर्ववत केल्या जातील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. ११ नोव्हेंबरपासून ३६२ लोकल गाड्या रेल्वे रुळावरुन धावतील, मिळालेल्या माहितीनुसार लोकल गाड्या जुन्या टाइम टेबलनुसार धावतील.
सियालदह विभागात सर्वात जास्त गर्दी असल्याने याठिकाणी एकूण २२८ लोकल अप-डाऊन मार्गावर धावणार आहेत. हावडा विभागात १०० लोकल व उर्वरित ३४ गाड्या दक्षिण-पूर्व विभागातील खडगपूर येथून धावतील. कोरोना महामारीमुळे बंगालमध्ये लोकल ट्रेन सेवा २० मार्चपासून बंद होती. राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात २ नोव्हेंबर रोजी बैठक झाली, ज्यामध्ये पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वे १० ते १५ टक्के क्षमतेने लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर बुधवारी दोन्ही बाजूंची पुन्हा बैठक झाली आणि गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल, असे पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे
सोमवारी पुन्हा होणार बैठक
सोमवारी उभय पक्षांची पुन्हा बैठक होईल, त्याबरोबरच प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जाईल. यासह गाड्यांचे वेळापत्रकदेखील प्रसिद्ध केले जाईल, यासंदर्भातील अधिसूचनाही मंगळवारी देण्यात येणार आहे.
गर्दीला नियंत्रित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची
रेल्वे स्थानकांवर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असे रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे. यासंदर्भात प्रत्येक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचार्यांची नेमणूक करावी लागेल आणि थर्मल स्क्रीनिंगचीही व्यवस्था करावी लागेल.
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी महाराष्ट्राची रेल्वेला विनंती
सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेला विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी राज्य सरकारकडून रेल्वेला करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर रेल्वेकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, मात्र पश्चिम बंगालला लोकल सेवा सुरु झाली असली तर मुंबईकर अद्याप प्रतिक्षेत आहे.