नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये आज जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. काळ्या ढगांमुळे दिवसभर अंधार असून वाहनचालकांना हेडलाइटचा लावून रस्त्यावरून वाहन चालवावे लागत आहे. पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये वातावरण थंडगार झाले असून, त्यामुळे लोकांना गरमीपासून दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राजधानीचे कमाल तापमान ३७.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७.३ अंश सेल्सिअस होते. कमाल आर्द्रता पातळी ८६ टक्के तर किमान आर्द्रता पातळी ५३ टक्के होती. फरिदाबादमध्येही हवामान बदलले आहे. फरिदाबादमध्ये देखील जोरदार वादळासह पाऊस सुरू झाला. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास २६ सप्टेंबरपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटापर्यंत उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
आज सकाळपासूनच ऊन होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आर्द्रतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मान्सूनच्या प्रस्थानादरम्यान लोक हवामानातील बदलाची आतुरतेने वाट पाहत होते. अशा स्थितीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने याआधीच चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली होती. गुरुवारी हवामान खात्याने २३ सप्टेंबरनंतर दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवली होती. जून आणि जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे, मात्र ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.