उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत अनेक राज्यात पावसाचा हाहाकार, रेड अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:06 AM2021-10-18T11:06:03+5:302021-10-18T11:08:05+5:30
Heavy Rainfall In India: केरळमध्ये मुसळधार पावसादरम्यान झालेल्या विविध घटनांमध्ये 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नवी दिल्ली: अनेक राज्यांमध्ये सध्या सौम्य ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे, तर दक्षिण भारतात पावसाने कहर केला आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे. दिल्लीत मुसळधार पावसानंतर सखल भागात पाणी भरले आहे. आज (सोमवारी) लोकांना कार्यालयात जाण्यात अडचण येत आहे. त्याचबरोबर केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तराखंडच्या 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
हवामान विभागाने (IMD) उत्तराखंड(Uttarakhand) मध्ये आज आणि उद्या(मंगळवारी) मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. तसेच, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा पाहता उत्तराखंडमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि पुढील 48 तास डोंगराळ भागात फिरू नये, असंही सांगण्यात आलं आहे.
केरळमध्ये पावसाचा कहर
केरळमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामध्ये आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोलून सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे.
पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पावसामुळे-पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाची टीम मदत कार्यात गुंतलेली आहेत. तिरुअनंतपुरम, कोल्लमसह 7 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. तर, पथानामथिट्टासह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.