- शरद गुप्ता
नवी दिल्ली : आता मुसळधार पाऊस किंवा पुरामुळे रस्ते खराब होणार नाहीत. कारण ते आता खडी, वाळूऐवजी स्टीलच्या (पोलाद) कचऱ्यापासून बनवण्यात येणार आहेत. सीमा रस्ते संघटना (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील मुसळधार पावसाच्या क्षेत्रात (अतिवृष्टीप्रवण भाग) असाच एक रस्ता बांधत आहे. असाच प्रयोग गुजरातमधील हजीरा येथे यापूर्वीच यशस्वी झाला आहे.
केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने (सीआरआरआय) काही मुख्य स्टील उत्पादक कंपन्या आणि पोलाद मंत्रालयाच्या मदतीने हजीरा येथे १.१ किलोमीटरचा रस्ता स्टील स्लॅगपासून (लोखंड खनिजाची मळी) बनवला आहे. लोह खनिजापासून स्टील बनवल्यानंतर उरलेल्या टाकाऊ पदार्थाला स्लॅग (मळी) म्हणतात. सीआरआरआयने रस्तेबांधणीत वाळू आणि खडीच्या जागी या कचऱ्याचा वापर केला आहे. स्टील स्लॅगपासून बनवण्यात येणारा रस्ता सामान्य रस्त्याच्या तुलनेत अनेक पटीने अधिक मजबूत असल्याचे सिद्ध होत आहे.
एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदआता या कचऱ्याचा उपयोग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (न्हाई) बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांतही करण्यात येईल. तसेच रेल्वे रुळाच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या खडीच्या ठिकाणीही याचा वापर करण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही समावेश करण्यात आला.
अतिरिक्त कमाईचा मार्ग- केवळ सरकारी पोलाद कंपन्यांतच जवळपास १०० एकर जमिनीचा वापर या स्लॅगच्या साठवणुकीसाठी केला जात होता. - खासगी कंपन्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन नाही. त्यामुळे त्या जागा किरायाने घेऊन स्टीलच्या कचऱ्याची साठवणूक करत होत्या. - मात्र, सीआरआरआयने शोधलेल्या तंत्रज्ञानाद्वारे या कचऱ्यातून २३ टक्के स्टील काढणे शक्य झाले असून, सोबतच उरलेल्या कचऱ्याचादेखील उपयोग होऊ लागल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे, असे पांडे यांनी सांगितले.