ऑनलाईन लोकमत
चेन्नई, दि. ४ - गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत हाहाकार माजवणा-या पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चेन्नईतील अनेक भाग अजूनही पाण्याखाली असून, मदतपथकांना नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवणे अत्यंत कठीण झाले आहे.
पूराचे पाणी अजूनही ओसरले नसून, पावसाने घेतलेली विश्रांती हाच आमच्यासाठी दिलासा आहे असे येथील रहिवाशांनी सांगितले. अद्यार नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. दक्षिण रेल्वेने चेन्नई बीच स्टेशनवरुन तिरुनवेली, रामेश्वरम आणि हावडासाठी विशेष गाडयांची घोषणा केली आहे. पाणी ओसरलेल्या भागांमध्ये विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला आहे. पण अजूनही अनेक भाग अंधारामध्ये आहेत. मोबाईल फोन सेवाही काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. शहरातील अनेक भागातील एटीएम अजूनही बंद आहेत.
'फुलराणी' सायनाची दोन लाखांची मदत
भारताची 'बॅडमिंटन क्वीन' सायना नेहवालने चेन्नईतील पूरसग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. तिचे वडील हरवीर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. पूरामुळे संपूर्ण तामिळनाडूत हाहाकार उडाला असून हजारो नागिरक बेघर झाले आहेत. कित्येकांनआ अनेक दिवस अन्न-पाणीही मिळालेले नाही. पूर ओसरला असला तरीही जनजीवन विस्कळीतच असल्याने मोठ्या आर्थिक व मानसिक आधाराची गरज असून सायनाने सामाजिक भान जपत पूरग्रस्तासांठी मदतनिधी दिला आहे.