पाऊस.. दोन
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
कान्होलीबारा
कान्होलीबारापरिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी पिकापासून निराशा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा निसर्गाने पाणी फेरले आहे.परिसरात रबी पिके चांगलीच बहरली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वादळासह पावसाला सुरुवात झाली. यात गव्हासह अन्य रबी पिकांची नासाडी झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तारसातारसा परिसरात पहाटे २ वाजताच्या सुमारास जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेल्या धानाच्या गंज्या भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.परिसरातील तारसा, इसापूर, कुंभारी, नवेगाव, आष्टी, बारसी, सालवा, यसंभा, मांगली, सावरगाव, चाचेर, नेरला, नंदापुरी, दुधाळा, बानोर, निमखेडा, पारडी, कलापार्डी, धनी, विरसी, गांगनेर, खंडाळा आदी गावात जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतातील गव्हाला पूर्णपणे वारा लागल्याने गव्हाचे उत्पादन काळवंडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आधीच नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर या अवकाळी पावसामुळे नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने पिकांचे सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.धामणाबुधवारी पहाटे ३ वाजेपासून या परिसरात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्रीनंतर अचानक वादळास सुरुवात झाली. काही वेळानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गहू, हरभरा, टमाटर, संत्रा आदी पिकांसह भाजीपाल्याची नासाडी झाली. धामणा, शिरपूर (भुयारी), पेठ, सातनवरी, बाजारगाव, व्याहाड, नेरी आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी पावसाचा गव्हाला सर्वाधिक फटका बसला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. धामणा येथील शेतकरी धनराज टोंगे यांच्या शेतातील संपूर्ण गहू जमीनदोस्त झाला. पंचायत समिती कृषी विभागाचे विष्णू आदमने, कृषी पर्यवेक्षक कानगो, कृषी सहायक श्रीप्रकाश टोंगसे व तलाठी नारायणे आदीनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यात ५० टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.