मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे राजधानी दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील ५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाभस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा धोका लक्षात घेऊन एसडीआरएफची टीम तैनात करण्यात येत आहे. तर उत्तराखंडमध्ये टिहरी, देहराडून, पौडी, हरिद्वार, चम्पावत, नैनीताल आणि उधमसिंह नगर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासाठीही अलर्ट जारी करून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.
दिल्लीमध्ये यमुना नदीला आलेल्या पुरानंतर आता दिल्लीमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात १६ ते १९ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चार दिवसांमध्ये कमाल तापमान हे ३१ ते ३२ डिग्री आणि किमान तापमान हे २६ ते २७ डिग्री एवढे राहू शकते. तर २० जुलैपासून पावसाचं प्रमाण कमी होईल. दिल्लीमध्ये १५ जुलैपर्यंत ३०८ मिमी पाऊस पडला आहे. तो सरासरी पावसापेक्षा १०५ मिमी अधिक आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या अलर्टने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या तीन दिवसांमध्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ा या दरम्यान, ४५ ते ५५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.